औरंगाबाद: हर्सूल तलावाजवळ एक ३५ वर्षीय मजुराने गळफास घेऊन आत्महत्या केली तर पिसादेवी भागात एका ५५ वर्षीय वृद्धाने घरच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
प्रभाकर जगन्नाथ बर्डे वय-३५ (रा.हर्सूल तलाव जवळ,जटवाडा रोड ) असे आत्महत्या करणाऱ्या मजुरांचे नाव आहे तर रामचंद्र किसन चव्हाण वय-५५ वर्षे (रा.जैननगरी, पिसादेवी) असे दुसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.
हर्सूल येथे राहणार मृत प्रभाकर या मजुराने परिसरातील हनुमान मंदिर परिसरात एका झाडाला साडीच्या साहाय्याने गळफास घेतला. ही घटना आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास समोर आली. या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.
तर दुसरी घटना पिसादेवी भागात घडली.५५ वर्षीय चव्हाण यांना दमा आणि अर्धांगवायूचा आजार असल्याने ते अनेक दिवसांपासून आजारी होते. पिसादेवी भागात ते मुलगा सूनासोबत राहत होते .बुधवारी संध्याकाळी त्यांनी आजाराला कंटाळून इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेतली होती. उपचारादरम्यान रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला .या प्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पुढील तपास हवलंदार डी के थोरे हे करीत आहेत.